पंचायत समितीच्या बैठकीत अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर; तालुक्यातील हजारो रुग्णांना मिळणार अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ
कवठेमहांकाळ तालुक्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या 100 बेड रुग्णालयाच्या मागणीला आता अधिक वेग आला आहे. कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयाचे 100 बेड रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या मासिक बैठकीत अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ते 100 बेड क्षमतेचे करण्याची मागणी तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय भोसेकर आणि त्यांच्या सहकारी टीमने आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे केली होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत आमदार पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच हा प्रस्ताव प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे कवठेमहांकाळसह जत, आटपाडी, सांगोला, तासगाव आणि सीमावर्ती भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार व आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत.
बुधवारी झालेल्या कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सदस्य प्रा. अर्जुन कर्पे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. सदस्य प्रभावती निकम यांनी या ठरावाला अनुमोदन दिले.
सभापती सिंधुताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपसभापती वामन कदम, सदस्य दिलीप झुरे, रविकिरण घागरे, वैशाली माने, प्रियंका गेंड यांच्यासह सर्व सदस्यांनी ठरावाला समर्थन देत तो टाळ्यांच्या कडकडाटात सर्वानुमते मंजूर केला. यावेळी पंचायत समितीचे विविध विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
कवठेमहांकाळ तालुक्याच्या आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून, सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली. पंचायत समितीच्या या अभिनंदन ठरावामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.