प्रकल्पाची माहिती नसताना जनतेला भडकवू नका; देवगडच्या विकासाला विरोध खपवून घेतला जाणार नाही : नितेश राणे

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 27 June 2026 | 👁 165 Views
प्रकल्पाची माहिती नसताना जनतेला भडकवू नका; देवगडच्या विकासाला विरोध खपवून घेतला जाणार नाही : नितेश राणे
पर्यावरणाला हानी पोहोचवणारा कोणताही प्रकल्प स्वीकारणार नाही; प्रथम माहिती, मगच भूमिका ठरवू



देवगड : देवगड तालुक्यात प्रस्तावित प्रकल्पाबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसताना काही व्यक्तींकडून ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केला. देवगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या विषयावर शासनाची भूमिका स्पष्ट करत विकासविरोधी शक्तींना थेट इशारा दिला.

राणे म्हणाले की, देवगडमध्ये नेमका कोणता प्रकल्प प्रस्तावित आहे, त्याचे स्वरूप काय आहे, त्याचा पर्यावरणावर किंवा स्थानिकांवर काय परिणाम होणार आहे, याबाबत जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनाही अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र काही व्यक्ती गावोगावी बैठका घेऊन अंबा, काजू बागायती नष्ट होतील, परिसर उद्ध्वस्त होईल अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत.

प्रकल्पाची संपूर्ण माहिती समोर आल्यानंतर संबंधित अधिकारी, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांना एकत्र बसवून सादरीकरण केले जाईल. त्यानंतरच पुढील भूमिका निश्चित केली जाईल. माहिती नसताना जनतेला भडकवणे चुकीचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोकण आणि सिंधुदुर्गच्या पर्यावरणाबाबत शासन अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगताना राणे म्हणाले की, पर्यावरणाला हानी पोहोचवणारा कोणताही प्रकल्प राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वीकारणार नाहीत. मात्र रोजगारनिर्मिती, उद्योग आणि स्थानिक विकासाला चालना देणारे प्रकल्प जिल्ह्यात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

देवगड आणि सिंधुदुर्गमधील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, स्थलांतर कमी व्हावे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळावे यासाठी विविध प्रकल्प आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे. रोजगारनिर्मिती आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखतच विकास साधला जाईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, बाहेरील काही शक्ती विकासकामांना विरोध करण्यासाठी कोकणात सक्रिय झाल्याचा आरोप करत अशा घटकांमुळे देवगडचे वातावरण बिघडू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जनतेसमोर जबाबदार आहोत. ग्रामस्थांच्या हिताला बाधा पोहोचेल असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |