बियाणे आणि औषधांच्या दरवाढीने शेतकरी मेटाकुटीला
👤 संपादक - आण्णासाहेब मेटकरी |
📅
02 May 2026 |
👁 62 Views
जव्हार /जितेंद्र मोरघा जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय मानला जातो. मुसळधार पाऊस पडणाऱ्या या भागात पाणी अडविण्याचे कोणत्याही प्रकारे नियोजन असल्याने केवळ या भागात खरीप हंगामात शेतीची कामे केली जातात. खरीप हंगाम संपल्यानंतर येथील शेतकरी हा पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे कुटुंबासहित स्थलांतरित होत असतो. अशी साधारण आर्थिक परिस्थिती अवलंबून असलेल्या या भागात यंदा शेतीसाठी उपयुक्त बियाणे आणि औषधांच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने येथील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या खरीप हंगामाची चाहूल लागलेली असतानाच बळीराजासमोर नवे संकट उभे ठाकले आहे. रासायनिक खते, कीटकनाशके आणि कृषी निविष्ठांच्या किमतीत गेल्या काही दिवसात कंपन्यांनी भरघोस वाढ केल्याने शेतीचा उत्पादन खर्च गगनाला भिडणार आहे. अगोदरच बेमोसमी पाऊस, आसमानी संकटाने त्रासलेल्या शेतकऱ्याला युद्धजन्य परिस्थितीत शेतीपयोगी लागणारे वस्तू खरेदी करताना चांगलीच कसरत होणार आहे.