मुंबई | प्रतिनिधी
राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे या ३० जुलै ते २ ऑगस्ट २०२६ दरम्यान बीड जिल्ह्याच्या चार दिवसीय दौऱ्यावर राहणार असून, जिल्हा नियोजन विकास समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीसह विविध सार्वजनिक कार्यक्रम आणि नागरिकांच्या भेटीगाठींना त्या उपस्थित राहणार आहेत.
अधिकृत दौऱ्यानुसार, ३० जुलै रोजी त्या मुंबईहून छत्रपती संभाजीनगरमार्गे बीड येथे दाखल होऊन शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील.
३१ जुलै रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत बीड जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत त्या सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता सिरसाळा येथे कै. वसंतराव नाईक सार्वजनिक जयंती महोत्सवात उपस्थित राहतील.
१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.१५ वाजता परळी वैजनाथ येथील साठेनगरमध्ये आयोजित लोकनायक अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवात त्या सहभागी होतील. सायंकाळी ५ वाजता परळी वैजनाथ येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या कवी संमेलनालाही त्या उपस्थित राहणार आहेत.
२ ऑगस्ट रोजी सकाळी परळीहून अंबाजोगाईकडे प्रस्थान करून दुपारी १२ ते २ या वेळेत अंबाजोगाई येथील जनसंपर्क कार्यालयात अंबाजोगाई व केज मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता नांदेडमार्गे मुंबईकडे त्यांचा परतीचा प्रवास होणार आहे.
ना. पंकजाताई मुंडे यांच्या या दौऱ्यामुळे जिल्हा नियोजन, विकासकामांचा आढावा, जनसंपर्क आणि विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त होणार असल्याचे मानले जात आहे.