कणकवलीत १६ ऑगस्टला सम्यक साहित्य संसदेच्या पुरस्कारांचे वितरण

👤 तुषार शिंगाडे | 📅 09 August 2026 | 👁 14 Views
सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्गच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या आ.सो. तथा आबा शेवरे जीवनगौरव पुरस्कार आणि उत्तम-सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कारांचे वितरण रविवार, १६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी.एल. सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत शिवा इंगोले यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार असून, सम्यक साहित्य संसदचे अध्यक्ष तथा प्रसंसवादचे संपादक इंजि. अनिल जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला साहित्यिक व प्रकाशक सुनील हेतकर, माजी उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू, सिंधुदुर्ग अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, आंबेडकरी चळवळीतील प्रभावी वक्ते व लेखक प्रा. डॉ. सोमनाथ कदम, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत कदम, अपरान्तचे प्रकाश जाधव तसेच दर्पण प्रबोधिनीचे श्रीधर तांबे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विनायक मिठबांवकर यांना जीवनगौरव
परिवर्तनवादी साहित्यविश्वातील ज्येष्ठ कवी, कोकणातील आंबेडकरी कवितेचे जनक तसेच सम्यक साहित्य संसद व प्रसंसवादचे संस्थापक ज्येष्ठ कवीवर्य आ.सो. तथा आबा शेवरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा आ.सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व राजकीय विश्लेषक विनायक मिठबांवकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
मिठबांवकर यांनी आपल्या प्रगल्भ लेखणीतून अन्यायाविरुद्ध निर्भीड आवाज उठवत बहुजन समाजाच्या व्यथा-वेदना शब्दबद्ध केल्या. ‘हे जगणे का?’ (१९७२) आणि ‘संधीप्रकाश’ (१९७३) या कादंबऱ्यांमधून त्यांनी वास्तववादी साहित्याला नवी दिशा दिली. कविता, स्फुटलेखन, सदरलेखन, पत्रलेखन, वैचारिक व ललित लेखन अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी योगदान दिले आहे.
त्यांनी सुरू केलेल्या ‘उधाणलाटा’ या साप्ताहिकामुळे कोकणातील परिवर्तनवादी पत्रकारितेला नवे अधिष्ठान मिळाले. तसेच दैनिक मराठा, कोकण वैभव, शिवनेरी, नवाकाळ, रत्नागिरी टाइम्स, सागर, रत्नभूमी, तरुण भारत आणि पुढारी आदी वृत्तपत्रांतून त्यांनी पत्रकारिता केली आहे.
स्नेहा कदम यांना राज्यस्तरीय काव्य पुरस्कार
‘शिल्लक भीतीच्या गर्भकोषातून’ या बहुचर्चित काव्यसंग्रहाच्या कवयित्री स्नेहा कदम यांना उत्तम-सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कदम यांनी आपल्या काव्यातून अस्मितेचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवत तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, विज्ञाननिष्ठा व मानवमुक्तीच्या विचारांना अधोरेखित केले आहे. विधायक विद्रोहातून समतेचा विचार मांडणाऱ्या त्यांच्या साहित्यिक योगदानाची राष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीमध्ये निमंत्रित कवयित्री म्हणून त्यांचा गौरव झाला असून त्यांच्या काव्यसंग्रहाला पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य प्रतिभा पुरस्कार, भीमराव कोते विशेष काव्य पुरस्कार, रत्नसिंधू युवा साहित्य कला गौरव पुरस्कार तसेच ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
दुसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन
पुरस्कार वितरणानंतर दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ कवी मनोहर सरंबळकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कवी संमेलनात विविध मान्यवर कवी-कवयित्री सहभागी होणार आहेत.
या साहित्यिक सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व साहित्यिक, विचारवंत, कवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सम्यक साहित्य संसदचे सहकार्यवाह मधुकर मातोंडकर, कोषाध्यक्ष संध्या तांबे, हिशोब तपासणीस दीपक तळवडेकर आणि कार्यवाह राजेश कदम यांनी केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
तासगावात 9ऑगस्ट क्रांतीदिन उत्साहात साजरा | हक्कांच्या संघर्षासोबत समाजविकासाची नवी वाट; ‘मेंढपाळ आर्मी’ची उल्लेखनीय वाटचाल | महेश नार्वेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त कणकवलीत सफाई कामगारांना धान्य वाटप | कणकवलीत १६ ऑगस्टला सम्यक साहित्य संसदेच्या पुरस्कारांचे वितरण | 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी हीच अण्णासाहेबांसाठी लाख मोलाची शुभेच्छा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | " दहीहंडी पथकातील गोविंदांसाठी 10 लाखांचे विमाकवच!" | महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनात डॉ. बापूजी साळुंखे यांचे योगदान महत्त्वाचे : प्रा. सी. वाय. मानेपाटील | सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांची मुळदे येथील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्पास भेट* | ज्येष्ठ शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने मोठी पोकळी; वैभव नाईक यांच्याकडून श्रद्धांजली | महिला नेत्यांचा अवमान महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा नाही; हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी – निशिकांत कडुलकर |