देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत युवक व नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत २० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांना अनोखी मानवंदना अर्पण केली.
शुक्रवारी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर जवानाच्या स्मृतींना यावेळी उपस्थितांनी आदरांजली वाहिली.
आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान (वैभववाडी), रावराणे मित्र मंडळ (वैभववाडी) आणि राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वैभववाडी पंचक्रोशीतील युवक, नागरिक आणि रक्तदात्यांनी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेतला. एकूण २० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे भान जपले. देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्याच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रक्तदानासारखा जीवनदायी उपक्रम राबविण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमास जि.प. सदस्य प्रमोद रावराणे, भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, संचालक शरद रावराणे, सतीश रावराणे, विजय रावराणे, राजेश पडवळ, आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राचार्य के. सी. चव्हाण, अधीक्षक संजय रावराणे आदी उपस्थित होते.
हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृती केवळ अभिवादनापुरत्या मर्यादित न ठेवता रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमातून जपण्याचा हा प्रयत्न ठरला. ‘देशासाठी बलिदान देणाऱ्या वीराला जीवनदानाच्या कार्यातून मानवंदना’ देणारा हा उपक्रम नागरिकांसाठीही प्रेरणादायी ठरला.