‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास कार्यरत असलेल्या पोलीस दलावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने सांगली जिल्हा पोलीस दलाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गुन्ह्यांच्या तपासात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे शिस्तबद्ध, पारदर्शक आणि नियमानुसार हस्तांतरण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम हा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच नागरिकांच्या विश्वासाला बळ देणारा ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा होते. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. खरे क्लब हाऊसच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी तसेच मुद्देमालाचे विश्वस्त-मालक उपस्थित होते.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा म्हणाले, गुन्ह्यांना प्रतिबंध आणि घडलेल्या गुन्ह्यांचा वेळेत छडा या दोन्ही बाबींसाठी पोलीस दल कर्तव्यदक्ष आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. केंद्र शासनाच्या पोर्टलच्या माध्यमातूनही कार्यवाही केली जात आहे.
आज १३४ तोळे सोन्याचे दागिने, ४० किलो चांदी, २८३ मोबाईल आणि २४,५०० किलो बेदाणा असा जवळपास चार कोटी रुपयांचा मुद्देमाल संबंधितांना परत देण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास निश्चितच वृद्धिंगत होईल, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांनीही दक्ष राहून गुन्हा घडल्यास ११२ क्रमांकावर तक्रार करावी. तपासासाठी सहकार्य व पाठपुरावा करावा, असे आवाहन करून विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा म्हणाले की, पोलीस अधिकाऱ्यांनी मुद्देमाल हस्तांतरणाचे उद्दिष्टनिहाय काम करावे. महिनावार संबंधितांचे ऐवज परत करावेत. आपल्या माध्यमातून संबंधित पीडिताला दिलासा देण्याचे काम होते, याची जाणीव ठेवून पोलीस दलावरील नागरिकांचा विश्वास वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत.
गुन्ह्याचा योग्य वेळी छडा लावून मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल तसेच मुद्देमाल हस्तांतरणाचा चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
“मुद्देमाल परत केला तर पीडितास खऱ्या अर्थाने न्याय”
पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले, गुन्ह्यांना प्रतिबंध आणि गुन्हे अन्वेषण हे पोलिसांचे प्रमुख काम असले तरी गुन्ह्यातील संपत्ती संबंधितास परत केली तर पीडितास खऱ्या अर्थाने न्याय मिळतो.
दागिने हा केवळ ऐवज नसून, संबंधितांची भावनिक गुंतवणूक त्यात झालेली असते. मूर्ती, दागिने यांना सांस्कृतिक महत्त्वही असते. त्यामुळे हा मुद्देमाल परत करताना संबंधिताचे भावनिक मूल्यही परत केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी प्रास्ताविकात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अचूक अभिलेख आणि नियमित पडताळणी यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुद्देमाल व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस दल सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन सुनील गुरव यांनी केले. आभार मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी मानले.
पोलिसांप्रती कृतज्ञता
कवठेमहांकाळचे डॉ. म्हेत्रे : कवठेमहांकाळचे डॉ. म्हेत्रे यांच्या घरात १४ सप्टेंबर २०२५ रोजी ‘स्पेशल २६’ चित्रपटासारखी घटना घडली. त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दोन ते तीन दिवसांत मुद्देमाल परत मिळवला. आज तो मुद्देमाल त्यांना परत देण्यात आला. याबद्दल त्यांनी पोलीस विभागातील सर्व टीमचे आभार व्यक्त केले.
रमाबाई शिवाजी गायकवाड : रा. बाणूरगड येथील रमाबाई शिवाजी गायकवाड यांचे गंठण हा त्यांच्यासाठी केवळ दागिना नव्हता, तर त्यांच्या वडिलांनी दिलेला आशीर्वाद होता. त्यामुळे दीड वर्षापूर्वी गंठण हरवल्याने त्या व्यथित झाल्या होत्या. आज त्यांना गंठण परत सुपूर्द केल्यानंतर त्यांनी पोलीस विभागाचे विशेष आभार व्यक्त केले.
बिरोबा देवस्थानचे दागिने परत : बिरोबा देवस्थानचे दागिने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवले जात होते. साधारण सहा महिन्यांपूर्वी त्या बँकेच्या शाखेत दरोडा पडल्याने देवस्थानचे दागिने लुटले गेले होते. सांगली जिल्ह्यातील या मोठ्या चोरीचा छडा जिल्हा पोलीस दलाच्या नेतृत्वाखाली दोन महिन्यांतच लावण्यात आला. हा मुद्देमाल आज देवस्थानच्या ताब्यात परत देण्यात आला.
यासाठी बिरोबा देवस्थान व ट्रस्टच्या वतीने विभूतवाडीचे माजी सरपंच व देवस्थानचे पुजारी चंद्रकांत पावणे यांनी पोलीस दलाचे आभार मानले.
पारदर्शक आणि लोकाभिमुख पोलीस व्यवस्थेचा संदेश
एकूणच, सांगलीसारख्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सातत्याने आव्हाने असलेल्या जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ अंतर्गत प्रशासकीय प्रक्रिया न राहता पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख पोलीस व्यवस्थेचा संदेश देणारा ठरला आहे. कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल संबंधित नागरिकांच्या स्वाधीन करताना पोलिसांनी केवळ संपत्ती परत केली नाही, तर नागरिकांच्या मनातील विश्वासालाही नवी उभारी दिली.