महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गंभीर आजारांवरील उपचारासाठी मुंबईतील केईएम, टाटा, वाडिया, महात्मा गांधी मेमोरियल, कामा, ग्लोबल यांसारख्या प्रमुख रुग्णालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. उपचारासाठी अनेक दिवस मुंबईत राहावे लागत असल्याने रुग्णांसोबत आलेल्या गरीब व गरजू नातेवाईकांच्या निवासाचा प्रश्न गंभीर बनतो. ही समस्या लक्षात घेऊन प्रमुख रुग्णालयांच्या परिसरात ‘आरोग्य कॉरिडॉर’ (Health Corridor) विकसित करून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुरक्षित, स्वच्छ, सुसज्ज आणि अत्यल्प दरातील निवासव्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.
यासंदर्भात आमदार प्रमोद जठार यांनी महाराष्ट्राचे गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज राजेश भोईर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. उपचारासाठी परजिल्ह्यातून मुंबईत येणाऱ्या अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना परवडणारी निवासव्यवस्था उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर फुटपाथ, रस्त्याच्या कडेला किंवा उघड्यावर राहण्याची वेळ येते. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अशी परिस्थिती चिंताजनक असल्याचे जठार यांनी मंत्री भोईर यांच्या निदर्शनास आणून दिले.
प्रमुख रुग्णालयांच्या परिसरात धर्मशाळा, डॉरमेटरीची सुविधा
‘आरोग्य कॉरिडॉर’च्या माध्यमातून प्रमुख रुग्णालयांच्या परिसरातील उपलब्ध शासकीय अथवा योग्य जागांचा वापर करून धर्मशाळा, डॉरमेटरी तसेच अल्पदरातील निवास केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या हजारो गरीब व गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या नातेवाईकांना रस्त्यावर किंवा उघड्यावर राहण्याची वेळ येणार नाही.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी DCPR 2034 मधील उपलब्ध तरतुदींचा प्रभावी वापर करण्याची मागणीही करण्यात आली आहे. पुनर्विकास प्रकल्पांमध्ये अतिरिक्त FSI अथवा प्रीमियममध्ये सवलत, मालमत्ता करातील सवलत तसेच Development Rights हस्तांतरणासारख्या प्रोत्साहनात्मक तरतुदींचा वापर करून खासगी विकासक आणि धर्मादाय संस्थांचा सहभाग वाढविण्याचा प्रस्ताव आहे.
तसेच DCPR 2034 मधील Reg. 33(2) अंतर्गत उपलब्ध तरतुदींचा प्रोत्साहनात्मक वापर करून धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून अशा निवास सुविधा उभारण्याची शक्यता तपासावी, अशी मागणीही जठार यांनी केली.
‘ही केवळ निवासाची योजना नसून मानवतावादी उपक्रम’
उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होते; मात्र त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांच्या निवासाचा प्रश्न अनेकदा दुर्लक्षित राहतो. त्यामुळे ‘आरोग्य कॉरिडॉर’ ही केवळ निवासाची योजना नसून आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आधार देणारी मानवतावादी संकल्पना असल्याचे आमदार प्रमोद जठार यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई; उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा); महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA); मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ; मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ तसेच उपआयुक्त (आरोग्य), बृहन्मुंबई महानगरपालिका आदी अधिकारी उपस्थित होते.