कणकवली बाजारपेठेत जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा -पाच जणांवर गुन्हा दाखल
👤 तुषार शिंगाडे |
📅
12 August 2026 |
👁 22 Views
कणकवली बाजारपेठेतील एका लॉजच्या पाठीमागील बाजूस पत्र्याच्या शेडलगत सुरू असलेल्या बेकायदा जुगारावर कणकवली पोलिसांनी छापा टाकून पाच जणांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवारी, ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे जुगार खेळणा-यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जुगार कारवाईत संशयित अशोक रतन भोई (वय ५५, रा. नाडकर्णी चाळ, कलमठ), शिवा शिवानंद पाटील (वय ३०, रा. टेंबवाडी), चेतन विश्वनाथ माने (वय ३८, रा. बांदकरवाडी), महेश भिकाजी मोरे (वय ४४, रा. नाडकर्णी चाळ, कलमठ), राजू शिवराम जमादार (वय ४२, रा. सोनगेवाडी, कणकवली) हे आरोपी पत्त्यांवर पैसे लावून 'अंदर-बाहर' नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी संशयित आरोपींकडून त्यांच्या अंगझडतीतील रोख रक्कम तसेच जुगाराच्या ठिकाणी चटईवर ठेवलेली ८ हजार २०० रुपये रोख रक्कम असा एकूण १४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल, ८९ पत्ते आणि जुगारासाठी वापरण्यात आलेली जुनी चटई असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन अशोक माने यांनी फिर्याद दिली. त्यानुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई कणकवली पोलीस निरिक्षक कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक रवींद्र पन्हाळे, महिला पोलीस उपनिरिक्षक वृषाली बर्गे, पोलीस कॉन्स्टेबल डी.डी. चव्हाण यांच्या पथकाने केली, दरम्यान, या कारवाईमुळे जुगार खेळणा-यांचे धाबे दणाणले आहे.