माळशिरस तालुक्यातील धनगर समाजातील ज्येष्ठ नेते आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अंबादासभाऊ पाटील (कण्हेर-इस्लामपूर) यांचे वयाच्या ८८व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. अंबादास भाऊपाटील यांनी अतिशय खिलाडू वृत्तीने राजकीय क्षेत्रामध्ये उडी घेऊन सर्व समाजातील घटकांना संघटित करून स्थानिक राजकारणापासून जिल्हा परिषदेच्या सभागृहापर्यंत जनतेचे प्रश्न सोडवण्याची प्रतिनिधी या नात्याने अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा केली. जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती उपसभापती या कालावधीत त्यांनी शासकीय योजना प्रत्येक लाभार्थ्यांना मिळवून देण्याची भूमिका पार पाडली. याहीपेक्षा त्यांनी संपूर्ण समाजाला एक आदर्श निर्माण करण्यासाठी एकत्र कुटुंबपद्धती अतिशय बुद्धीच्या जोरावरती राबवली आई -वडील, चुलते- मालते ,भाऊ-बहिणी मुले -पुतणे ,नातवंडे या सर्वांना एकमेकाच्या नात्यागोत्याचं प्रेम अतिशय प्रेमळ स्वभावातून निर्माण करून एक आदर्श रुपी कुटुंब प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांच्या शालेय जीवनामध्ये अतिशय अभ्यासू वृत्तीने पूर्ण समाजामध्ये त्या काळातील पदवीधर म्हणून नाव मिळवले होते. जुन्या काळातील शिक्षण क्षेत्राचे महत्त्व ओळखणाऱ्या अंबादास भाऊंनी कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत असताना मुले मुली पुतणे या सर्वांना सुसंस्कारित करून शिक्षण क्षेत्राचे महत्त्व पटवून देऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कुटुंबातील मुलां-मुलींना यशस्वी करण्यात मार्गदर्शकाची भूमिका घेतली. अशा या आजात शत्रू नेतृत्वाच्या मृत्यूची बातमी समजताच अनेक जिल्ह्यातून नातेवाईक स्नेही मंडळी सगेसोयरे त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अंबादासभाऊ पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी बहुगर्दी केल्याचे त्यांचे अंत्ययात्रेत दिसून आले. त्यांच्या निगर्वी, शांत, संयमी व मायाळू स्वभावाचे वर्णन भावपूर्ण श्रद्धांजली च्या माध्यमातून अनेकांनी व्यक्त केले. सेवानिवृत्त अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धनंजय पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी ,भाऊ-बहिणी मुले- मुली पुतणे , जावई असा मोठा परिवार आहे.