जय हिंद पूर्व व वर्तमान सैनिक संघटना (इंदापूर) यांच्या वतीने रविवारी २७ वा कारगिल विजय दिवस विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने भव्य देशभक्ती रॅली काढण्यात आली. तसेच वीर माता, वीरांगना, शहीद कुटुंबीय आणि कारगिल युद्धातील योद्धे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात रविवारी सकाळी १० वाजता मालोजीराजे भोसले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर मालोजीराजे चौक ते संभाजी महाराज चौक या मार्गावर देशभक्तीपर रॅली काढण्यात आली.
यावेळी मारुती मारकड यांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार, संस्थेच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. वृक्षप्रेमी सामाजिक संस्था, इंदापूर वतीने वृक्षप्रेमी धर्मचंद लोढा यांच्या कल्पनेतून वीर माता, वीरांगना, शहीद कुटुंबीय, जखमी सैनिक आणि कारगिल योद्ध्यांचा ट्रॉफी, शाल, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थित सर्वांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना विनम्र अभिवादन केले.
त्यानंतर संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून इंदापूर नगर परिषद कार्यालयापर्यंत ढोल-नगाऱ्यांच्या गजरात आणि देशभक्तीच्या घोषणांसह पायी रॅली काढण्यात आली. नगर परिषद परिसरातील स्वातंत्र्यसैनिक स्मारकावर पुष्पांजली अर्पण करून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.