जत तालूका कायम दुष्काळाशी दोन हात करत आला आहे. वार्षिक पर्जन्यमानापेक्षा दरवर्षी पाऊस कमी पडतो व तालुक्यात दुष्काळ व दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होते. दुष्काळाचे हे चित्र बदलायचे असेल तर जतकरांनी पुढाकार घेणे काळाची गरज आहे. जतकरांनो,हरित महाराष्ट्राचा संकल्प करत वृक्षारोपन व वृक्ष संवर्धन मोहीम हाती घ्या असे आवाहन जतचे प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसिलदार प्रवीण धानोरकर यांनी केले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व येळवी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने येळवी येथील श्री संत बाळूमामा मंदिर परिसर व जवळील गायरान जमिनीवर प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसिलदार प्रवीण धानोरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करत हरित महाराष्ट्र 300 कोटी वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्रीराम फरकांडे, शिक्षण विस्तार अधिकारी अन्सर शेख, मंडळ अधिकारी दिलीप चवरे, तलाठी हर्षदा गवळी, वन विभागाचे बिराजदार, वगरे, जाधव, श्रीमती वाघमारे, येळवीच्या सरपंच आरतीताई अंकलगी, पोलीस पाटील वंदना माने-पाटील, खैरावच्या पोलीस कांताबाई पाटील, ग्रामसेवक रवींद्र कोळी, केंद्र प्रमुख शिवराम यादव कोतवाल बाळासो चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
येळवी येथील श्री समर्थ शिवप्रभू हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज येथील प्राचार्य नंदकुमार खंडागळे, सहशिक्षक मारुती जमदाडे, पवार सर, मासाळ सर यांच्यासह विद्यार्थी वृक्षारोपण करम्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी आपण वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यांचे महत्व जाणतो पण कृती करत नाही ही वस्तुस्थिती आहे. संपूर्ण महाराष्ट्र जर हरित महाराष्ट्र करायचा असेल तर त्याची सुरुवात प्रत्येकांनी आपल्या घरापासून, गावापासून करावी लागणार असून ती करावी असे आवाहन केले.
यावेळी मेजर रामचंद्र वायफळकर, रामहरी भंडे, भालचंद्र गडदे, कोंडीबा घुटुकडे, भारत क्षिरसागर, लक्ष्मण मदने, यशवंत मदने, दत्तात्रय मदने, संतोष पोरे, तानाजी व्हनमाने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावित, स्वागत व आभार श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमेटीचे मारुती मदने यांनी मानले.