निरा व भिमा नद्यांवरील 16 बंधाऱ्यांमध्ये कारखाना अडविणार- हर्षवर्धन पाटील
निरा भिमा कारखान्याकडून कार्यक्षेत्रातील नीरा नदीवरील कळंब ते नीरा नरसिंहपूर पर्यंतचे 13 बंधारे व भिमेवरील भाटनिमगाव, टणु व शेवरे असे 3 बंधारे याप्रमाणे एकूण 16 बंधारे अडविणे व नंतरच्या काळात लिकेजही काढणेची जबाबदारी घेतली जाणार आहे. त्यामुळे किमान मे महिन्यापर्यंत बांधाऱ्यांमध्ये पाणी रहावे व त्याचा ऊस उत्पादन शेतकऱ्यांना फायदा व्हावा, असा कारखान्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
ऊस पिकासाठी ए.आय. तंत्रज्ञान हे खरोखरच वरदान ठरत आहे. या तंत्रज्ञानामुळे ऊस पिकासाठी पाणी व खत बचत होऊन एकूणच उत्पादन खर्चामध्ये मोठी बचत होत आहे. परिणामी, ए.आय. तंत्रज्ञानामुळे ऊस पिकाच्या उत्पादनामध्ये मोठी वाढ होऊन शेतकऱ्यांचा भरीव आर्थिक फायदा होणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी केले.शहाजीनगर (ता. इंदापूर ) येथील निरा-भिमा सहकारी साखर कारखान्यावरती ऊस पिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (ए. आय.) या विषयावरती परिसंवाद संपन्न झाला. सदर प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील बोलत होते. प्रारंभी कर्मयोगी शंकररावजी पाटील व लोकनेते शहाजीराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन हर्षवर्धन पाटील सौ.भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, सध्या शेत जमिनी खालील क्षेत्र कमी होत चालले आहे. तसेच पारंपरिक पद्धतीने ऊस शेती केली जात असल्याने ऊसाची उत्पादकताही वाढत नाही. या परिस्थितीमध्ये ए.आय. तंत्रज्ञानाचा ऊस पिक घेणेसाठी वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. सध्या निरा भिमा कारखान्याच्या कार्यस्थळावरती व बावडा येथील शहाजीबागेमध्ये माझ्या शेतीमध्ये ए.आय. तंत्रज्ञानावर उसाचे पीक घेतले आहे. सदरची पिके ही पारंपरिक पद्धतीच्या ऊस पिकापेक्षा अतिशय जोमदार आलेली आहेत. ए.आय. तंत्रज्ञानामुळे ऊस पिकाच्या उत्पादनात सुमारे 25 ते 30 टक्के वाढ अपेक्षित आहे.
निरा भिमा कारखाना कार्यक्षेत्रात 5 ठिकाणी वेदर स्टेशन ( स्वयंसचलित हवामान केंद्र) उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून सुमारे 125 ते 150 शेतकरी प्रारंभी ए.आय. तंत्रज्ञानावर ऊस पीक घेता येणार आहे. या शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती पाणी, खत हे कधी व कोणत्या प्रमाणात द्यावे, रोग पडल्यास पिकावर तात्काळ कोणते औषध फवारावे याची माहिती शेतकऱ्यांना मोबाईलवरती मिळणार आहे. त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून निरा भिमा कारखान्याच्या सहभागी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार असून, उर्वरित प्रति हेक्टर पर्यंत लागणारी रु.6750 ची रक्कम निरा भिमा कारखाना भरणार असून नंतर सदर रक्कम गळीतास आलेल्या ऊस बिलातून जमा करून घेतली जाईल, याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, अशी आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले. तसेच नीरा भीमा कारखाना सध्या रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असून, त्यानिमित्ताने कारखान्यातील विविध घटकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे वरिष्ठशास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग यांनी सांगितले की, जमिनीमध्ये हवा व पाणी यांचे प्रमाण किती आहे ते ए. आय.मुळे समजते, ए. आय.च्या माहितीमुळे खतांची कार्यक्षमता वाढते, ऊस पिकाच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेत गरज लक्षात घेऊन किती पाणी द्यावे हे ए.आय. सांगते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ए.आय. शिकणे सोपे आहे, असे त्यांनी नमूद केले.
तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील प्रमुख ऊस प्रजनन विभाग डॉ.श्री.के.व्ही.सुशिर यांनी उसाच्या व्हि.एस.आय.21121 व व्हि.एस.आय.25121 या वाणाची माहिती दिली. सदरचे दोन्ही वाण हे उत्पन्न व साखर उताऱ्यामध्ये उत्कृष्ट असून लवकरच ते आगामी काळात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना विज्ञान विज्ञान केंद्र बारामतीचे कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) तंत्रज्ञान विभाग प्रमुख तुषार जाधव यांनी सांगितले की, सध्या ऊस शेतीमध्ये पाण्याचा गरजेपेक्षा अतिरिक्त वापर होत असल्याने जमिनी क्षारपड होत आहेत, मात्र आता ए.आय. मुळे पाणीबचत होऊन ऊस उत्पादनात मोठी वाढ होत आहे. मानवी बुद्धिमत्तेमध्ये काही बाबी राहू शकतात, मात्र ए.आय.मध्ये अमर्याद विचारशीलतेमुळे कोणत्याही त्रुटी राहू शकत नाहीत. उपग्रह प्रणाली तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतामध्ये सेंन्सोरच्या माध्यमातून ऊस पिका संदर्भातील मार्गदर्शन शेतकऱ्यांना मोबाईलवर मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी केले. यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, अँड.कृष्णाजी यादव, विकास पाटील, किरण पाटील, उपसभापती जयकुमार कारंडे, सुरेश मेहेर, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, दत्तात्रय पोळ, निवृत्ती शिंदे, मोहन गुळवे, तानाजी नाईक, भागवत गोरे आदीसह पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अँड.अनिल पाटील यांनी मानले.