दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील खुटबाव माध्यमिक विद्यालय, खुटबाव येथे विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी निर्भय पथकाच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन, स्वसंरक्षण आणि महिला सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध कायदे, सुरक्षा उपाय आणि आपत्कालीन मदत क्रमांकांची माहिती जाणून घेतली.
हा कार्यक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
यावेळी दहिवडी उपविभागीय निर्भय पथक क्र. ५ मधील पोलीस कॉन्स्टेबल टी. जी. चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल एस. एस. पोळ तसेच महिला पोलीस अंमलदार राजश्री खाडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत महिला सुरक्षा, स्वसंरक्षण, बालकांचे हक्क, सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि कायदेविषयक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारचा त्रास, छेडछाड किंवा अन्य अडचण उद्भवल्यास त्वरित डायल 112 तसेच महिला हेल्पलाईन 1091 वर संपर्क साधून मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच कोणतीही घटना लपवून न ठेवता पालक, शिक्षक किंवा पोलिसांना त्वरित माहिती देण्याचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमास खुटबाव गावचे सरपंच श्री. डुबल, पोलीस पाटील श्री. चोपडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची निर्भय पथकाच्या अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे देत त्यांचे शंकानिरसन केले.