"जय जय राम कृष्ण हरी" च्या गजरात आषाढी वारीचा सोहळा पुढे सरकत असतानाच, इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे वारकऱ्यांसाठी सेवेचा अनोखा यज्ञ पाहायला मिळाला.
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवार दि. 17 जुलै रोजी निमगाव केतकी येथे दाखल होताच, कै. सोपानराव भोंग चॅरिटेबल ट्रस्ट व गजराज परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पालखी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांसाठी भव्य अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
"भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी, हीच खरी पांडुरंगाची पूजा" या संत वचनाला साजेसा हा उपक्रम पाहून संपूर्ण गाव भारावून गेले.
ताटात वाढलेला गरमागरम प्रसाद आणि चेहऱ्यावरचे समाधान पाहून "वारीतील थकवा क्षणात नाहीसा होतो" असे उद्गार अनेक वारकऱ्यांनी काढले.
कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्माई यांच्या मूर्तीची पूजा करून करण्यात आली. त्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार व कै. सोपानराव भोंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
"सेवा हीच खरी श्रद्धा आहे" हा संदेश देत हा अन्नदान सोहळा पार पडला.
या सेवाकार्यात इंदापूर पंचायत समिती सदस्य रणजीत भोंग यांच्यासह विनय जाधव, संदीप भोंग, मनोज भोंग, राहुल भोंग, अथर्व भोंग, रोहन लोखंडे, नील भोंग हे पदाधिकारी सकाळपासूनच सेवेत तैनात होते.
यावेळी अमिता भोंग, प्रमिला भोंग, वृषाली भोंग, रोशनी भोंग, शर्मिला भोंग यांच्यासह भोंग परिवारातील महिला भगिनींनीही वारकऱ्यांना प्रसाद वाढला.
कै. सोपानराव भोंग चॅरिटेबल ट्रस्ट व गजराज परिवार यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.