आदिवासी क-ठाकूर समाजातील शिक्षक संजय रांदडा आणि कल्पेश भोगाडे यांनी एलएलबी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून समाजाचा मान उंचावला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात संजय रांदडा यांनी ७१.१३ टक्के गुण मिळवत यश मिळवले, तर कल्पेश भोगाडे यांनी ७१.९० टक्के गुण प्राप्त करून एलएलबी परीक्षा उत्तीर्ण होत शैक्षणिक क्षेत्रासह विधी शिक्षण क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.शिक्षक म्हणून जबाबदाऱ्या सांभाळत असताना उच्च शिक्षणाची कास धरून त्यांनी हे यश मिळवले आहे. नोकरी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि अभ्यास यांचा समतोल साधत त्यांनी दाखवलेली जिद्द, चिकाटी आणि परिश्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहेत.
या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये तसेच आदिवासी क-ठाकूर समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या या दोन्ही शिक्षकांनी उच्च शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील युवकांना नवा आदर्श निर्माण करून दिला आहे.
समाजातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षकवर्ग, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध मान्यवरांनी दोघांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विधी क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करत न्याय, सामाजिक जाणीव आणि जनसेवेच्या कार्यात ते योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.एलएलबी परीक्षेत मिळवलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल शिक्षक संजय रांदडा व शिक्षक कल्पेश भोगाडे यांचे सर्व स्तरांतून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.