येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ मध्ये ५ जून रोजी 'जागतिक पर्यावरण दिनाचे' औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
सकाळी ठीक पावणेदहा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाला गावातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. शिडवणे गावचे सरपंच रविंद्र शेट्ये यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा परिसरात एकूण ५ विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये आंबा, रतांबा (कोकम), वड, पिंपळ आणि जांभूळ या पर्यावरणपूरक व बहुगुणी वृक्षांचा समावेश आहे.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य योगेश सुतार व तारीफ शेख, शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल, उपशिक्षक सुरेंद्र यादव उपस्थित होते. तसेच अंगणवाडी सेविका प्रियांका पाटणकर, मदतनीस कविता केतकर, ग्रामस्थ सत्यवान गुंडये व अनिल गुंडये यांनीही उपस्थित राहून वृक्षारोपणात सहभाग घेतला. शाळेचे विद्यार्थी मंथन भोवड आणि कार्तिक सुतार या विद्यार्थी प्रतिनिधींनी देखील मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण केले.