असलदे गावातील जमीन विक्रीसाठी ग्राम समितीची नियमावली

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 June 2026 | 👁 83 Views
असलदे गावातील जमीन विक्रीसाठी ग्राम समितीची नियमावली
भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य ; ग्रामविकास समितीच्या बैठकीत निर्णय
असलदे गावातील जमीन, पर्यावरण, संस्कृती आणि स्थानिक ग्रामस्थांचे हित जपण्यासाठी ग्राम समितीने जमीन विक्रीबाबत विशेष नियमावली प्रस्तावित केली आहे. गावातील शेतीजमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील जमिनी परप्रांतीयांना विक्री बंदी सोबतच पुढील काळात जमिनीचे विक्री संदर्भात गावक-यांनी स्वत:हून पुढाकार एक आदर्श नियमावली तयार करत गावातील भूमिुपुत्रांना प्राधान्य देण्याचा निर्णय ग्रामविकास समितीच्या बैठकीत घेतला आहे.
असलदे श्री देव रामेश्वर पावणादेवी चव्हाटा येथे ग्रामविकास समितीचे अध्यक्ष उदय परब यांच्या अध्यक्षतेखाली गावसभा पार पडली. यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके , माजी सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच सचिन परब , उद्योजक सुरेश डामरे , अजय परब , छत्रुघ्न डामरे ,पत्रकार नरेंद्र हडकर, तुषार घाडी , सचिव प्रदीप हरमलकर , दिलीप डामरे , संदेश आचरेकर , प्रकाश आचरेकर , मनोज लोके , महेश लोके , विजय आचरेकर, रघुनाथ लोके, दिनेश शिंदे , बाबाजी शिंदे , विजय डामरे , मेहुल घाडी, अशोक पाताडे , सुरेश मेस्त्री ,संतोष घाडी , आत्माराम घाडी, रुपेश खरात , विजय खरात , अनिल नरे , विजय परब, प्रशांत परब,संतोष परब, संतोष डामरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

ग्रामसमितीच्या नियमावलीनुसार कोणत्याही जमीन मालकाने जमीन विक्री करण्यापूर्वी प्रथम प्राधान्य आपल्या भावकीला, त्यानंतर वाडीतील नागरिकांना आणि पुढे गावातील स्थानिक रहिवासी व भूमिपुत्रांना द्यावे. जमीन विक्रीचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या भावकीला, वाडीला व संबंधित मंडळांना माहिती देऊन त्यानंतर ग्राम समितीला कळवणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर संबंधित व्यवहाराची माहिती गावासमोर मांडली जाईल आणि त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.


गावातील इच्छुक खरेदीदार उपलब्ध नसल्यास ग्राम समिती संबंधित प्रकरणाचा सविस्तर विचार करेल. जमीन विक्रीमागील कारणे, विक्रेत्याची आर्थिक परिस्थिती, वारसांची उपलब्धता आणि उपजीविकेची गरज यासारख्या बाबींवर गाव बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
गावातील ठरावानुसार बाहेरील व्यक्तींना जमीन विक्री करण्यापूर्वी गावातील भूमिपुत्रांना संधी देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या ठरावाच्या विरोधात जाऊन जमीन व्यवहार करण्यासाठी कोणी पुढाकार घेतल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रे, जलस्रोत, देवस्थाने आणि सार्वजनिक वापराच्या जागांच्या आसपास होणाऱ्या जमीन व्यवहारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. गावातील जमीन विक्री, खरेदीखते, करारनामे तसेच महसूल कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या संबंधित प्रक्रियांवर ग्राम समिती आणि ग्रामस्थांकडून लक्ष ठेवले जाणार आहे. संशयास्पद किंवा नियमबाह्य व्यवहार आढळल्यास त्याची तातडीने माहिती गावविकास समितीला देण्यात येईल.जमीन विक्री करताना खरेदीदाराला गावातील परंपरा, सामाजिक सलोखा आणि नियमांची माहिती देणे आवश्यक राहणार आहे. तसेच गावातील रस्ते, पाणवठे, स्मशानभूमी, देवस्थाने आणि इतर सार्वजनिक मालमत्तांवर कोणतेही अतिक्रमण होणार नाही यासाठी सर्व ग्रामस्थांनी दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गाव सभेत मंजूर झालेल्या या नियमावलीचा उद्देश शेतकऱ्यांच्या जमिनींचे संरक्षण करणे आणि गावाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे हा आहे. गावाच्या ठरावाला बाधा आणणाऱ्या व्यक्तींविरोधात सामाजिक पातळीवर कारवाई करण्याचाही इशारा ग्राम समितीने दिला आहे. गावातील जमीन आणि पर्यावरण संरक्षणासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |