सांगलीत 'फिल्मी स्टाईल' थरार; ४५ मिनिटांच्या थरारक पाठलागानंतर आंतरराज्य गांजा तस्कर जेरबंद

👤 राहुल एडके तासगाव | 📅 22 May 2026 | 👁 192 Views
सांगलीत 'फिल्मी स्टाईल' थरार; ४५ मिनिटांच्या थरारक पाठलागानंतर आंतरराज्य गांजा तस्कर जेरबंद
विना नंबर प्लेटच्या भरधाव इनोव्हा कारमधून तब्बल १३४ किलो गांजाची आंतरराज्य तस्करी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने गुरुवारी रंगेहात अटक केली. पोलिसांनी सिनेमालाही लाजवेल अशा पद्धतीने सांगली शहराच्या गजबजलेल्या भागातून तब्बल ४५ मिनिटे थरारक पाठलाग करून या तस्कराच्या मुसक्या आवळल्या. आरोपीकडून १३४ किलो गांजा, कार आणि मोबाईल असा एकूण ४२ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सांगली पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
​विकी विजय कांबळे (वय ३२, रा. भिमनगर, पिंपळी रोड, जाळोची, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
​गोपनीय माहितीवरून कवलापुरात सापळा
​पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी आणि विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार संदीप नलावडे व सागर लवटे यांना २० मे रोजी एका विश्वसनीय सूत्राकडून गोपनीय माहिती मिळाली. बारामती येथील एक सराईत गुन्हेगार सोनेरी रंगाच्या विना नंबर प्लेटच्या इनोव्हा कारमधून मोठ्या प्रमाणात गांजाची खेप घेऊन मायणी-विटा-तासगाव मार्गे सांगली शहरात येत असल्याची पक्की माहिती मिळताच, एलसीबीच्या पथकाने मिरज जवळील कवलापूर येथे तात्काळ सापळा रचला.
​पोलिसांना हुलकावणी अन् ४५ मिनिटांचा थरार!
​कवलापूर येथे दबा धरून बसलेल्या पोलिसांना संशयित इनोव्हा कार भरधाव वेगाने येताना दिसली. पोलिसांनी इशारा करून कार थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने गाडीचा वेग वाढवून पोलिसांना हुलकावणी दिली आणि कार थेट सांगली शहराच्या दिशेने पळवली.
​यानंतर एलसीबीच्या पथकाने कोणतीही वेळ न गमावता मोटारसायकल आणि खाजगी वाहनांच्या साहाय्याने त्या कारचा थरारक पाठलाग सुरू केला. संशयित चालक सांगलीतील रहिवासी आणि गर्दीच्या भागातून वेडीवाकडी वाहने चालवत पळत होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने संजयनगर आणि एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यांना वायरलेसवरून अलर्ट दिला.
​माधवनगर, संजयनगर, अहिल्यानगर आणि रामरहीम कॉलनी परिसरातून चाललेल्या तब्बल ४५ मिनिटांच्या 'हाय-व्होल्टेज' पाठलागानंतर, पोलिसांनी अखेर जुना जकात नाका, कुपवाड चौक येथे संशयित कारला चहूबाजूंनी वेढा घातला आणि चालक विकी कांबळे याला शिताफीने ताब्यात घेतले.
​डिकीत ६६ खाकी पाकिटे; ओडिशा कनेक्शन उघड
​पोलिसांनी पंचांसमक्ष इनोव्हा कारची कसून झडती घेतली असता, कारच्या डिकीत खाकी रंगाच्या चिकटपट्टीने गुंडाळलेली ६६ पाकिटे आढळून आली. या पाकिटांमध्ये तब्बल १३४ किलो तयार गांजा भरलेला होता, ज्याची बाजारपेठ किंमत ३३ लाख ५० हजार रुपये आहे. याशिवाय ९ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार आणि मोबाईल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हा गांजा थेट ओडिशा राज्यातून आणल्याची कबुली आरोपीने दिली. सांगलीतील 'पप्पू फाकडे' नामक व्यक्तीला हा माल पोहोचवण्यासाठी तो बारामतीहून तासगाव मार्गे येत होता.
​आरोपी बारामतीतील 'त्या' मोठ्या गुन्ह्यात होता 'वाँटेड'
​अटक करण्यात आलेला आरोपी विकी कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वीही त्याच्यावर गांजा वाहतुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या ४७८ किलो गांजाच्या मोठ्या प्रकरणात तो पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता. या गुन्ह्यात तो मुख्य आरोपी असून पोलीस त्याचा शोध घेत होते.
​या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे करत आहेत. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि सांगलीतील इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
​कारवाई करणारे पोलीस पथक:
​ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लघु थाटे, पोलीस अंमलदार संदीप नलावडे, सागर लवटे व एलसीबी आणि एमआयडीसी कुपवाड पोलिसांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |