ग्राहकांची अडवणूक करणाऱ्या, चढ्या दराने विक्री करणाऱ्या पंपांचा परवाना निलंबित करणार -जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

👤 राहुल टिबे सांगली | 📅 20 May 2026 | 👁 212 Views
ग्राहकांची अडवणूक करणाऱ्या, चढ्या दराने विक्री करणाऱ्या पंपांचा परवाना निलंबित करणार -जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
- पेट्रोल पंपांना अचानक भेट देऊन केली तपासणी - पंपधारकांचे प्रतिनिधी, सेल्स अधिकाऱ्यांची घेतली बैठक - जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा - अनावश्यक गर्दी करू नये, अफवांना बळी न पडण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्यामध्ये सामान्य परिस्थितीमध्ये आवश्यक असणारा पेट्रोल, डिझेल व एलपीजीचा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले. परिस्थितीचा फायदा घेऊन ग्राहकांची अडवणूक करणाऱ्या किंवा चढ्या दराने इंधनाची विक्री करणाऱ्या पंपांचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.



मध्य-पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर इंधन पुरवठा साखळी विस्कळीत होणार नाही. तसेच, जिल्ह्यातील ग्राहकांना नियमित, अखंडित व सुरळीत इंधन पुरवठा सुरू राहण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दि. 19 मे रोजी रात्री विविध पेट्रोल पंपांना अचानक प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली व सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच, दि. 20 मे रोजी पेट्रोल, डिझेल पंपधारक यांचे प्रतिनिधी व सर्व सेल्स अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधनाची साठेबाजी किंवा कृत्रिम टंचाई निर्माण केली जाणार नाही, याची दक्षता पंपधारकांनी घ्यावी. इंधनाचा काळा बाजार किंवा साठेबाजी खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचना दिल्या. प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांच्यासह पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दररोज जिल्ह्यातील इंधनाची एकूण आवक, विक्री आणि शिल्लक साठ्याचा अहवाल घ्यावा. पेट्रोल पंपधारकांनी कोणत्याही एकाच वाहनाला मर्यादेपेक्षा जास्त (उदा. कॅन किंवा बॅरलमध्ये) इंधन न देता सर्वाना समान वाटप करावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले.



सद्यस्थितीत मुख्य डेपोमध्ये आणि जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे. आखाती देशातील परिस्थितीमुळे सध्या थेट पुरवठ्यावर कोणताही खंड पडलेला नाही, अशी माहिती ऑईल कंपन्यांच्या सेल्स ऑफिसर्सनी बैठकीत दिली. यावर सर्व सेल्स ऑफिसर्सनी त्यांच्या कंपन्यांच्या मुख्य डेपोच्या संपर्कात राहून सांगली जिल्ह्याचा इंधनाचा कोटा कमी होणार नाही आणि पुरवठा साखळीत खंड पडणार नाही, याची दैनंदिन खात्री करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ़. मैनाक घोष यांनी दिल्या.



युद्धजन्य परिस्थितीच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरून पंपांवर गर्दी होण्याची आणि काही ठिकाणी इंधनाची साठेबाजी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधनाची साठेबाजी किंवा कृत्रिम टंचाई निर्माण केली जाणार नाही, याची दक्षता पंप धारकांनी घ्यावी. पुरवठा विभागाने पेट्रोल पंपांच्या साठ्याची अचानक तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ़. मैनाक घोष यांनी यावेळी दिले.



इंधनाचा आजचा साठा

जिल्ह्यात पेट्रोलचा आयओसीएल कंपनीचा 1320 किलोलिटर, बीपीसीएलचा 570 किलोलिटर व एचपीसीएलचा 520 किलोलिटर असा एकूण 2410 किलोलिटर साठा शिल्लक आहे. डिझेलचा आयओसीएल कंपनीचा 1342 किलोलिटर, बीपीसीएलचा 750 किलोलिटर व एचपीसीएलचा 640 किलोलिटर असा एकूण 2732 किलोलिटर साठा शिल्लक आहे. तर एलपीजीचा एचपीसीएल कंपनीचा 1036 मेट्रिक टन, आयओसीएलचा 55 मेट्रिक टन व बीपीसीएलचा 135.3 मेट्रिक टन असा एकूण 1226.3 मेट्रिक टन साठा शिल्लक असून बीपीसीएलचा 73.8 मेट्रिक टन एलपीजी येण्याच्या मार्गावर आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |