सांगली, दि. 19 - येत्या 23 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 22 व 23 ऑक्टोबर रोजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्व राजकीय जाहिरातींना माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे (MCMC) प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, संस्था किंवा व्यक्ती यांना मुद्रित माध्यमांमध्ये जाहिरात द्यायची असल्यास ती अगोदर प्रमाणित करून घ्यावी लागणार आहे.
जाहिरात प्रमाणित करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, माध्यम कक्ष, जिल्हास्तरीय MCMC समिती, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली येथे अर्ज सादर करावा लागणार आहे.
तसेच, सर्व वृत्तपत्र संस्थांनी देखील MCMC प्रमाणित असल्याची खात्री केल्याशिवाय कोणतीही राजकीय जाहिरात प्रकाशित करू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.