हमाल नेत्याच्या नातवाच्या हत्येचा मुख्य सूत्रधार नीलेश गडदे गजाआड
सांगली : मिरज तालुक्यातील रेल्वे मालधक्का कामाच्या मक्तेदारी आणि खंडणीच्या वादातून घडलेल्या थरारक हत्याकांडातील मुख्य सूत्रधार नीलेश विठोबा गडदे (वय ३२) याला सांगली पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. घरात घुसून हमाल नेत्याच्या निष्पाप नातवाचा बळी घेणाऱ्या या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) शाखेने कर्नाटक सीमेलगतच्या एका लॉजवर मैत्रिणीसोबत रंगेहात पकडले.हत्येनंतर पोलिसांना गुंगारा देत कर्नाटकात पलायन केलेल्या गडदेने गुप्त लॉजमध्ये आश्रय घेतला होता. मात्र तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे एलसीबीने त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. नियोजनबद्ध सापळा रचत पोलिसांनी लॉजवर धाड टाकली आणि गडदेसह त्याच्या मैत्रिणीलाही ताब्यात घेतले.
या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली असून, गुन्ह्यातील अन्य तीन फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.