लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या ३ जून रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त राज्याच्या ग्रामविकास व महिला नेतृत्वाच्या क्षेत्रातील प्रमुख नेत्या Pankaja Munde यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी व मुंडेप्रेमींना इंधन बचतीचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान Narendra Modi यांनी देशवासीयांना इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषणमुक्त भारतासाठी दिलेल्या संदेशाला प्रतिसाद देत पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीदिनी विविध ठिकाणी आपापल्याला शक्य
तसे आणि इंधन बचतीसंदर्भातील उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे.
त्या म्हणाल्या की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी नेहमीच समाजहित, जनकल्याण आणि विकासाचा विचार केला. त्यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. इंधन बचतीमुळे आर्थिक बचतीसह पर्यावरणाचे संरक्षण होणार असून, प्रत्येक कार्यकर्त्याने यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा.
यावेळी पंकजाताई यांनी सर्व कार्यकर्त्यांना ३ जून रोजी आपल्या परिसरात सायकलचा वापर करण्याचा, अनावश्यक वाहनांचा वापर टाळण्याचा आणि इंधन बचतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचेल आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारांना अभिवादन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"मुंडे साहेबांची जयंती – इंधन बचतीची क्रांती" हा संदेश घेऊन राज्यभरातील कार्यकर्ते या उपक्रमात उत्साहाने सहभागी होणार असल्याचे चित्र दिसत आहे.