बाज गोळीबार प्रकरणाचे पडसाद! जतचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांची तडकाफडकी उचलबांगडी; कंट्रोल रूममध्ये रवानगी
👤 जत प्रतिनिधी |
📅
15 June 2026 |
👁 290 Views
बाज येथील खंडणी, धमकी आणि त्यानंतर घडलेल्या गोळीबार प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मोठी प्रशासकीय कारवाई करत कोळेकर यांना सांगली मुख्यालयातील नियंत्रण कक्षात (कंट्रोल रूम) नियुक्त केले आहे.फिर्यादी पक्ष तसेच भाजप नेत्या नीता केळकर यांनी कोळेकर यांच्यावर तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करणे, आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई न करणे आणि कामकाजात हलगर्जीपणा दाखवल्याचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे प्रकरणाला राजकीय आणि सामाजिक स्तरावरही मोठे महत्त्व प्राप्त झाले होते.या पार्श्वभूमीवर कोळेकर यांच्याविरोधात अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी रविवारी त्यांच्या बदलीचे तोंडी आदेश दिले. आदेशानुसार कोळेकर यांनी तत्काळ सांगली मुख्यालयातील नियंत्रण कक्षात रुजू झाल्याची माहिती समोर आली आहे.या कारवाईमुळे बाज गोळीबार प्रकरणातील तपास आणि संबंधित पोलीस यंत्रणेच्या भूमिकेबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले असून, पुढील चौकशी आणि प्रशासकीय निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.