धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर एक अत्यंत खळबळजनक आणि मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील तापी नदीच्या पुलावरून एका नवविवाहित दाम्पत्याने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. श्याम हरी पाटील (वय ३५) आणि त्यांची पत्नी (रा. पाडळसरे, ता. अमळनेर, जि. जळगाव) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हे दाम्पत्य सावळदे येथील तापी पुलावर संशयास्पद स्थितीत उभे होते. ते नदीत उडी घेण्याच्या तयारीत असल्याचे पाहून पुलावरील काही नागरिकांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. मात्र, नागरिक जवळ पोहोचण्यापूर्वीच दोघांनी एकाच ओढणीने स्वतःला एकमेकांच्या कमरेला बांधले आणि तापीच्या खोल पात्रात झोकून दिले. पुलावर त्यांची एमएच १९ डीटी ८३२३ या क्रमांकाची दुचाकी पोलिसांना मिळून आली.
मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले
घटनेची माहिती मिळताच नरडाणा आणि शिरपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक मच्छीमार आणि आपत्कालीन यंत्रणेच्या मदतीने तापी नदीच्या पात्रात तात्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास शिंदखेडा हद्दीतील दभाशी पुलाजवळ दोघांचेही मृतदेह आढळून आले. दुचाकीच्या क्रमांकावरून मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.
सुखी संसारात टोकाचे पाऊल का? कारण अस्पष्ट
मृत श्याम पाटील आणि त्यांच्या पत्नीचे लग्न अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच झाले होते. सुखी संसार सुरू असतानाच या नवविवाहित दाम्पत्याने अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रशासकीय अनास्था: सावळदे पुलावरील 'सेफ्टी नेट'चा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या दुर्दैवी घटनेमुळे सावळदे तापी पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. या पुलावरून यापूर्वीही अनेक नागरिकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या पुलावर तातडीने सुरक्षा जाळी (सेफ्टी नेट) बसवण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत आहे. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि दुर्लक्षामुळे हा प्रस्ताव अजूनही प्रलंबितच राहिल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.