अकोले | प्रतिनिधी
अकोले तालुक्यात काल झालेल्या वादळी पावसामुळे भंडारदरा, हरिश्चंद्रगड, रतनगड आणि पाचपट्टा परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. किरण लहामटे यांनी परिस्थितीची तात्काळ दखल घेत संबंधित शासकीय यंत्रणा, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक यांच्याशी समन्वय साधून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार रस्त्यावर पडलेली झाडे तातडीने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या संपूर्ण मदतकार्यात प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्परतेने सहभाग घेत नागरिकांना दिलासा दिला.
यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी नागरिकांना आवाहन केले की, वादळी पावसामुळे झाडे पडणे, रस्ते बंद होणे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्वरित स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. तसेच स्वतःची सुरक्षितता जपत प्रशासनाला सहकार्य करावे.
"संकटाच्या काळात नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असल्यास नागरिकांनी निर्धास्तपणे संपर्क साधावा. सर्वांच्या सहकार्याने आपण या संकटावर निश्चित मात करू," असे आवाहन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले.